Friday, 27 February 2015

दुर्योधन या व्यक्तिरेखेप्रति मी मला वाटलेले विचार मांडतोय. इथे खलनायक ठरलेल्या या व्यक्तिरेखेचा उदो उदो करण्याचा प्रयत्न करत नाही आहे, तर प्रत्येक माणसात काही न काही चांगले गुण पण असतात, पण बऱ्याचदा आपण काही जणांचे वाईट तेवढेच लक्षात ठेवतो, तर त्यांतील चांगल्या गुणांचा पण उहापोह व्हायला हवा यासाठी हा लेखनप्रपंच. कुणाला याप्रती मत मांडयचं असेल तर दुर्योधनाची याला मान्यता आहे. दुर्योधन : प्रत्येक कथेला एक नायक असतो आणि एक खलनायक. खलनायकाशिवाय नायकाची प्रतिमा उजळ होत नाही. महाभारताच पण तसच काहीस आहे. पांडवांची प्रतिमा उंचावण्यासाठी व्यासाने दुर्योधनाची प्रतिमा तेवढीच उठावदार बनवली आहे. त्याच्या पांडवान्प्रती दुष्कर्मांचे आणि कृत्यांचे असे काही प्रसंग त्याने निर्मिले कि एक जबरदस्त खलनायक या मिथकाला (?) मिळाला. पण जसा कुठलाही गुन्हेगार हा जन्मतः गुन्हेगार नसतो त्याला परिस्थिती तस बनवते. दुर्योधन पण त्याच परिस्थितीचा बळी होता. तो काही आईच्या पोटातुन वैर घेऊन नाही आला. तर तो बळी ठरला धृतराष्ट्राच्या राज्याप्रती असलेल्या आंतरिक इच्छांचा. पंडूच्या मृत्युनंतर तर त्याला कुरु राज्य आपलेच व आपल्या मुलांचे असेच वाटत होते, व सर्वात जेष्ठ असल्याकारणाने युवराजपद आपसुकच दुर्योधनाकडे जात होते व हेच बाळकडू त्याला लहानपणापासून मिळाले. त्या फुग्याला टाचणी लागली कुंतीच्या पांडवांबरोबर कुरुराज्यात परत येण्याने व राज्यावर अधिकार सांगण्याने. धृतराष्ट्र तोंडाने तर हेच बोलत होता कि पांडव त्याला सर्वात जास्त प्रिय आहेत, व हे राज्य त्याच्या जेष्ठ बंधू पंडूचेच आहे, पण मनोमन तो पांडवांचा भयंकर द्वेषच करत होता व हा द्वेषाग्नी त्याने दुर्योधानामध्ये सतत तेवत राहील याची काळजी घेतली. लहानपणापासून लाडात वाढलेलं मुल जसा हट्टी व स्वार्थी होत, तस दुर्योधनाच झालं. त्यात गांधारीने डोळ्यांवर पट्टी बांधल्याने तो संस्कारहीन पण झाला. तो कुणालाच जुमानेसा झाला. आणि पांडव तर त्याच्याप्रती उपरेच. त्यांचा अपमान करायची किंवा त्रास द्यायची एक संधी त्याने कधी सोडली नाही. तो माझे ऐकत नाही असे सांगून धृतराष्ट्राने हात झाडले, व गांधारी उपदेश करते म्हणून तो आईकडे जाणेच टाळू लागला. वडिलधाऱ्यांचा अपमान करण्यात त्याला काही चुकीचे वाटत नसे. भीष्माला, विदुराला व कृष्णाला वेळोवेळी त्याने बोल लावुन अपमानित केले आहे. पण काय एवढंच म्हणजे दुर्योधन काय? हे जे तो करत होत ते स्वाभाविक भितितुन, कि पांडव या राज्याचे राजे बनले तर कौरवांच भवितव्य काय. लहानपणापासून जे ऐश्वर्य भोगले आहे, त्याचा त्याग करावा लागणार व पांडवांचे आश्रित बनून राहावे लागणार. आणि यालाच त्याची मान्यता नव्हती व तयारी तर त्याहून नव्हती. सुईच्या अग्रावर मावेल एवढीही जमीन पांडवांना देणार नाही, हि घोषणा त्याचेच द्योतक आहे. त्यातूनच पांडवांना संपवण्यासाठी त्याने लाक्षागृह, दयुत, अज्ञानवासात असताना हल्ला असले प्रसंग घडवून आणले. पांडवांना त्रास देण्याच्या नवीन नवीन कल्पना त्याच्या डोक्यात सतत तयार असत. पण याबरोबरच, दुर्योधन एक जबरदस्त मल्ल, गदायुद्धात प्रवीण व एक उत्तम सारथी पण होतां. तो एक प्रजाहितदक्ष राजा असल्याचा युधिष्ठिराने पण मान्य केले आहे. त्याचे जे काही वैर होते, ते फक्त पांडवांशीच व ते वैर त्याने अखेरपर्यंत पाळले. मैत्रीची त्याला चांगली जाण होती व तो कर्तुत्व पारखी पण होतां हे कर्णाला त्याने जागच्या जागी अंगदेशाचा राजा करून व शल्याला (पांडवांचा सख्खा मामा) युद्धात आपल्या बाजूला वळवून सिद्ध केले आहे. तो जर का एक चांगला राजा नसता तर महाभारत युद्धात एवढे राजे त्याला सामील झालेच नसते, हे पण मान्य करावेच लागते. पांडवानी पण दुर्योधनाला कमी लेखण्याची संधी कधी सोडली नाही. मयसभेत फसगत झाल्यावर 'आंधळ्याचा पुत्र आंधळा' हे द्रौपदीचे उद्गार त्याचेच द्योतक. आपण घरी आलेल्या पाहुण्यांचा अपमान करत नाही, पण द्रौपदीने तेवढेही भान बाळगले नाही. याच अपमानाचा बदल त्याने मग पांडव दयुत हरल्यावर घेतला. त्याला काही द्रौपदीची अभिलाषा नव्हती किंवा तो वासनांध पण नव्हता, तर झालेल्या अपमानाचा बदला घेण्याची एक संधी म्हणून त्याने तिला कुरुसभेत निर्वस्त्र करण्याचा प्रयत्न केला. तेव्हाही त्याने कुणाचेच ऐकले नाही व हट्टाला पेटल्यासारखा तो पांडवांचा व भीष्मादी जेष्ठांचा अपमान करत कुरुसभेत ओरडत राहिला. युद्ध न करता पांडवांचा काटा काढता आला तर पाहावा म्हणून त्याने शकुनीच्या द्यूताच्या कल्पनेला मान्यता दिली व कर्णाला ते मान्य होणार नाही म्हणून त्याला दूर पण ठेवले. युद्ध करून पांडवांना हरवू हे कर्णाचे म्हणणे अखेर त्याने मान्य केले. व एकदा महाभारत युद्धाची घोषणा झाल्यावर मात्र आपल्याला दिसतो तो युद्धज्वर अंगी बाणवलेला दुर्योधनच. समोरची सेना बघून तो अर्जुनासारखा गलितगात्र झाला नाही. त्याले हेही माहित होत कि भीष्म, कृप, द्रोण या सर्वांच शरीर इथे आहे पण मन पांडवांकडे, पण तरीही तो त्यांना घेऊन लढला. स्वतःवर व कर्णाच्या पराक्रमावर त्याचा प्रचंड विश्वास होतां. तो एकदाच घाबरलेला दिसतो ते म्हणजे मरणाच्या भीतीने तळ्यात लपलेला असताना. पण तेव्हाही बाहेर आल्यानंतर तो प्राणपणानेच लढला आहे, ते पण कृष्णाने भीमाला सूचना केल्यामुळेच त्याला मृत्युं आला, अन्यथा तो भीमाला आवरत नव्हता. परंतु मरणपंथाला असतानाही जेव्हा त्याला कळले कि अश्वथाम्याने आपले वैर पुढे चालू ठेवले आहे तेव्हा त्या परिस्थितीतही त्याला अतीव आनंद लपवता आलेला नाही. क्षत्रियाचे मरण युद्धभूमीवर व्हावे असा संकेत आहे, तसेच वीराचे मरण त्याला आले आहे. तो भले एक दुष्कर्मा म्हणून जगला असेल, मरण मात्र त्याला विरोचित आले, ज्याला पांडव पण पारखे झाले. म्हणून दुर्योधनच खऱ्या अर्थाने महाभारत युद्धाचा नायक म्हणता येईल. त्याचा पांडवान्प्रतीचा असलेला आत्यंतिक द्वेषच या युद्धाचा कणा होतां, व तो द्वेष मनात बाळगूनच तो जगला व मरणही पावला.

No comments:

Post a Comment