Friday, 27 February 2015

सरकारचे डोके पुन्हा एकदा ठिकाणावर आहे काय ? कॉ. गोविंद पांसरेंच्या मारेकऱ्याची माहिती देणाऱ्यास कोल्हापूर महापालिकेने ५ लाख व महाराष्ट्र सरकारने २५ लाखांचे इनाम जाहीर करण्याची नामुष्की महाराष्ट्र सरकारवर व कोल्हापूर महापालिकेवर ओढवली आहे. शासन आणि सरकार अस्तित्वात आहे का? अशी परिस्थिती. डॉ. नरेंद्र दाभोळकरांचे खुनी सापडले नाहीत तोवर अजुन एका कार्यकर्त्याचा अशा तऱ्हेने खून, म्हणजे महाराष्ट्राच्या पुरोगामित्वावावर मारलेली चपराकच आहे. इनामाची वार्ता ऐकून शोले पिक्चरची आठवण झाली. गब्बरसिंगला पकडायला ठाकूर इनाम लावतो, आणि जय - विरु नावाचे गुंड त्याची सुपारी घॆउन गब्बरसिंगला ठाकूरच्या हवाली करतात. किती ढोबळ कथा, पण तिचे पडसाद अजुनही शासनाच्या अनास्थेने उमटतात. पैशाची लालूच दाखवली तर कोणीतरी काहीतरी माहिती देईल अशी सरकारी बाळबोध कल्पना. सरकारला हेच सांगायचं आहे बहुतेक कि, पैशाशिवाय कुठलही काम होत नाही. विचारवंत महाराष्ट्राचा लोप होऊन आता जंगलराज सुरु झाल्याची या दोन हत्या म्हणजे दारूण उदाहरण आहेत. बर दोन्ही हत्या झाल्यात त्या विशिष्ट कारणासाठी दोघे लढा देत होते तेव्हा झालेल्या आहेत, हा मुद्दा दुर्लक्षित करून चालणार नाही. दाभोळकरांची हत्या झाली तेव्हा जादूटोणा विरोधी बिल संसदेत पास व्हायचे होते. अनीसने जादूटोणा व बुवाबाजी विरोधात वातावरण समाजात तापवले होते. ठिकठिकाणी जाऊन समाजाला जागृत करण्याचे काम त्यांचे कार्यकर्ते जोमाने करत होते. आणि त्याच वेळेस डॉ ची हत्या झाली. कॉ पानसरे सध्या महाराष्ट्रात गाजत असलेल्या रस्ते टोल विरोधात आंदोलन करत होते व जन जागृती करत होते. कसलाही हिशेब नाही, कुणाचेही बंधन नाही, सरकारचा पर्यायाने लोकांचा पैसा टोल कंपन्यांच्या घशात घालण्याचा उद्योग या राज्यात वर्षानुवर्षे चालू आहे व त्याला कोणी आडकाठी केली तर सरकारही त्याला जुमानत नाही. असे बुवाबाजी व टोलधार्जिणे धोरण हे महाराष्ट्र सरकार राबवत आहे. या दोन विचारवंतांची हत्या करून समाजविघातक शक्तींना हाच संदेश द्यायचा आहे, कि जो कोणी आमच्या मनसुब्यांना विरोध करेल, आमच्या फायद्याच्या आड येईल त्याला असेच संपवण्यात येईल. व कुठलेही शासन व सरकार आमचे काहीच बिघडवू शकत नाही. व ज्याप्रकारे दीड वर्ष झाल्यावरसुद्धा दाभोळकरांचे मारेकरी अजुन सापडले नाही आहेत. त्यावरून समाजानेच आता काय समजायचं ते समजाव. माहिती अधिकाराचा वापर करणाऱ्या कितितरी कार्यकर्त्यांवर जीव गमवायची व हल्ला करण्यात आल्याची उदाहरण घडली आहेत, पण अजुनही कोणावर ठोस कारवाई झाल्याचे पाहणीत नाही किंवा पुरेश्या पुराव्याअभावी प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. शेवटी एवढंच म्हणायचं आहे कि, महाराष्ट्र आपला पुरोगामित्वाचा चेहेरा हरवत चालला आहे. विचारांची लढाई इथे आता हत्यारांनी जिंकली जाते. कॉ पांसरेंची प्राणज्योत मालवली तेव्हा सरकारला धारेवर धरण्याऐवजी आपण क्रिकेट वर्ल्डकपचे सामने बघण्यात मश्गुल होतो. अजुन दोन महिन्यांनी आय पी एल चे सामने सुरु होतील, मग तर काय बघायलाच नको. फक्त महाराष्ट्रच काय संपूर्ण भारतवर्ष क्रिकेटगंगेत न्हाऊन निघेल. समाजविघातक शक्तींना पोषक वातावरण तयार आहे या महाराष्ट्रात. आपण क्रिकेट सामने बघण्यात मश्गुल आणि ते त्यांचा कार्यभाग उरकण्यात. // जय हिंद, जय महाराष्ट्र //

No comments:

Post a Comment