Sunday, 4 October 2015


पाऊस आणि तु  :

हा पाऊस जेव्हा जेव्हा येतो, तुझी आठवण घेऊन येतो,

तुझी सय आली कि, डोळ्यात पाणी होऊन येतो,

पाऊस पण तुझ्यासारखाच थोडा लहरी आहे,

येतो तर सोसाट्याच्या वाऱ्यासारखा, 

उचंबळून प्रेम करणाऱ्या प्रेयसिसारखा,

नाहीतर दडतो ढगांच्या पडद्याआड,

खोडी काढून लपलेल्या मुलासारखा,

माझ्या अंतरंगात भरला आहे हा पाऊस आणि,

रोमरोमात दाटल्या आहेत तुझ्या आठवणी,

तुझ्या हरवलेल्या आठवणी, आठवून देणारा हा पाऊस,

तुझ्या केसांच्या बटांसारखा, भुरभुरणारा पाऊस,

तुझ्या पाणीदार डोळ्यांतील चमक घेऊन,

विजेशी लपंडाव करणारा पाऊस,

तुझे खळाळते हास्य होऊन, सभोवार कोसळणारा पाऊस,

तुझ्या निरामय सौन्दर्यासारखा, निसर्ग खुलवत येणारा पाऊस,

तुझ्या शब्दांच्या फणकाऱ्यासारखा, ढगांचे काळीज चिरत येणारा पाऊस,

तु नसताना, गुपचूप ठिबकून जाणारा पाऊस,

तु रागावलीस कि, दूर जाऊन बरसणारा पाऊस,

तु बरोबर असलीस कि, ओलेचिंब करून जाणारा पाऊस,

कस वेगळं करू तुला आणि या पावसाला,

तुम्हीच तर रंग भरलेत माझ्या जगण्याला,

जेव्हा जेव्हा हा पाऊस तुझी आठवण घेऊन येतो,

आणि तुझी सय आली कि, डोळ्यात पाणी होऊन येतो. 

No comments:

Post a Comment