भारत स्वच्छता अभियान :
आज सकाळी ऑफिस इमारतीजवळ एक रेली पाहिली. हिंदुस्तान पेट्रोलिअम कंपनीचे कर्मचारी भारत स्वच्छ अभियानाच्या घोषणा देत होते. हातात घोषणा फलक होते आणि सर्वांच्या डोक्यावर एकाच रंगाच्या (पिवळ्या) टोप्या होत्या. काही जणांच्या हातात झाडु होते आणि ते लोक उभ्या उभ्या जराही कमरेत न वाकता रस्त्यावरचा (कफ परेडच्या ) नसलेला कचरा साफ करायचा देखावा करत होते. आणि त्यांच्या पुढे एक छायाचित्रकार हे सर्व नाटक चित्रबद्ध करत होता. आता तुम्हीच सांगा मित्रहो, अशा ठिकाणी कचरा सफाईची अभियान राबवुन यांना काय उद्देश साधायचा आहे. करायचंच असेल तर नालेसफाई करा कि. दरवर्षी पावसाळ्यात याच नाल्यांमुळे रस्त्यांवर आणि रेल्वे रुळांवर पाणी साचण्याचे प्रकार घडतात. पण त्याकडे पुर्ण दुर्लक्ष करून आजकाल लोक भारत स्वच्छता अभियानाच्या अंतर्गत समाजातील विशिष्ट घटकांना खुश करायचीच योजना राबवत आहेत की काय अशी शंका येते. बर यांची ही जी काही तथाकथित रेली होती, ती पण कामाच्या वेळेत, म्हणजे स्वतःच्या पदरचा वेळही खर्च न करता यांना ही अशी कृती कशी करू दिली जाते, याचा अभ्यास व्हायला हवा. सरकारी पातळीवर अशा योजना म्हणजे काम न करता करमणुक करण्याचा मुक्त परवानाच जणु.
मुळात स्वच्छता अभियानासारखे कार्यक्रम देशात राबवण्याची पाळी येणे हीच मुळात लाजिरवाणी गोष्ट आहे. याचा एक जनसामान्य म्हणुन आपण कधी विचार करणार? मला रस्त्यात कचरा करायचा नाही किंवा मला रस्त्यात थुंकायचं नाही हे सांगायची किंवा त्यासाठी दंड करायची वेळ सरकारवर का यावी? याचा आपण विचार कधी करणार आहोत. कुठल्याही देशाच्या सरकारपुढे अनेक आव्हान, उद्दिष्टे असतात. स्वच्छता अभियानासारखं उद्दिष्ट कुठल्याही सरकारच असुच शकत नही. ही जबाबदारी त्या देशातल्या सुजाण नागरिकांची असते. पहिले स्वतःला, मग घराला, मग परिसराला स्वच्छ ठेवणे हे उद्दिष्ट प्रत्येक नागरिकाच असल पाहिजे. ते जर असेल तरच आपण या देशाचे सुजाण नागरिक आहोत असे आपण म्हणु शकतो.
आजकाल बरीच मंडळी विविध कारणांनी परदेशगमन करून येतात व परदेशातल्या स्वच्छतेच आणि तिथल्या नागरिकांच्या साफसुथरे राहण्याचं तोंड फुटेस्तोवर कौतुक करतात आणि आपल्या देशातील घाणीच्या साम्राज्याला नावे ठेवतात. ही मंडळी हे नेमकेपणाने विसरतात की या साम्राज्यवाढीला आपलाही हातभार लागलेला आहे. परदेशात असताना तिथले नियम पाळणारी ही शहाजोग मंडळी आपल्या देशात आली की सगळे नियम बासनात गुंडाळुन कचरा करायला तयार असतात. फक्त इंग्रज माणसाचं कौतुक करून आणि त्याची भाषा शिकुन आपण सुजाण बनलो का? याचा विचार व्हायला हवा. त्याची नियम पाळण्याची सवय आपण आपल्या अंगी जडवुन घ्यायला हवी. मी शेंगा खाल्ल्या नाहीत मी टरफ़ल उचलणार नाहीं हे बाणेदार उत्तर झालं, पण देश तेव्हाच स्वच्छ होईल जेव्हा आपण गांधी विचार अंगी बाणवुन दुसर्याची टरफ़ल पण उचलायला सिद्ध होऊ, आणि तेव्हा आणि तरच आपल्या सरकारला हे असले फुटकळ अभियान राबविण्याची गरज भासणार नाहीं, अस मला वाटतं.
Gandhi vichar jaroor follow karavet. Pan dusryane kelela kachra kiti divas uchalnar? Lok itke aalshi aani in-sensitive banaat jaatat ki dusra koni aapla kachra uchaltoy he baghun suddha kachra karatach rahteel.
ReplyDeletePrabodhanachi aani changlya savayinna samajaat respect milel hyachi soy vhayla havee.