Saturday 27 February 2016

आज प्रकर्षाने तुझी आठवण आली. तुला विसरलो नव्हतोच कधी, पण आज तू हवी होतीस, अस वाटल. तू माझी कोण होतीस या गोष्टीला आता काही अर्थ उरला नसला, तरी एक नक्की, तू माझी गरज होतीस. माझा आधार होतीस. मी विस्कटलो कि मला सावरणारी तूच एक होतीस. तु जेवढ मला समजून घेतलस, तेवढे कोणी प्रयत्न पण नाही केले. जगात वेड्या माणसाना किंमत नसते. सर्वाना शहाणी माणस हवी असतात. आणि तू मात्र या वेड्याला कधी तू वेडा आहेस हे जाणवू पण नाही दिलंस. हा तुझा शहाणपणा होता कि वेडेपणा यावर लोक चर्चा करतील. पण मी मात्र सदैव तुझा ऋणी राहीन, कि या वेड्या माणसाला तू आहेस तसा स्वीकारलस. कधीच उपदेशाचे डोस नाही पाजलेस. 

तू असताना कधी एकट अस वाटलच नाही. कुठल्याही प्रसंगात तू कायम बरोबर असायचीस. फक्त सल्ले नाही द्यायचीस. बरोबरीने उभी राहायचीस. खूप आधार वाटायचा तुझा मला. पण हे अस कुठवर चालणार होत. तू स्वतःचा काही विचार करतच नव्हतीस. जशी काही फक्त माझ्यासाठीच जगत होतीस. माझी पूर्ण जबादारी स्वीकारल्यासारखी. माझ्या भविष्याचा पत्ता नव्हता, पण तुझ्यापुढे पूर्ण आयुष्य पडलं होत. माझ्यासाठी तू खस्ता खावयास हे मनाला पटत नव्हत माझ्या. मग मीच तुला हळूहळू टाळायला सुरुवात केली. कुरबुरी काढून तुझ्याशी फटकून वागायला लागलो. आणि शेवटी तो दिवस उगवलाच. तुझा अखेरचा निरोप पण मी नीट नाही घेतला, आयुष्यात पहिल्यांदा तुला पाठ दाखवली. तोंड दाखवायची हिम्मत नव्हती म्हणून नव्हे तर, माझे रात्रभर रडून सुजलेले डोळे तुला दाखवायचे नव्हते. नाहीतर तू तुझा निर्णय बदलला असतास याची मला खात्री होती. तू तशीच होतीस. पाठमोरी, पाय खेचत नेणारी तुझी आकृती बघून मात्र माझा बांध फुटला आणि मी पुन्हा एकदा वेड्यासारखा डोळ्यातून समुद्र सांडत सैरावैरा धावत सुटलो. तो आजवर थांबलोच नाही. 

आयुष्य पुढे सरकत गेल. वाटा शोधत गेल. पडलो, धडपडलो, रडलो. तुझी आठवण आली नाही असा एकही दिवस गेला नाही. प्रत्येक ठेचेला तुझी आठवण यायची, मग मी सावरायचो. भीती वाटायची कि असाच रडत राहिलो तर तू स्वतःचा संसार सोडून माझ्यासाठी परत येशील. स्वतः विस्कटून मला सावरायला. 

एवढ्या लांबच्या प्रवासात खूप प्रवासी भेटले. काही मित्र झाले, काही सोडून गेले. प्रत्येक गोष्टीत वाकडा अर्थ काढणाऱ्या माणसाला कोणीही किती काळ आणि का सहन करेल. स्वभावातले स्वाभाविक दोष कळल्यावर लोक टाळायला लागले. मला कळायच कि दोष सर्वस्वी माझाच आहे. पण मला सवय लागून गेली होती किंवा तू कधी माझ्यातील दोषांना दोष मनालाच नाहीस, त्यामुळे असेल पण मला ते कधी दोष वाटलेच नाहीत. आणि तसही समुद्रात पोहोणाऱ्याला, तलावात पोहायचं अप्रूप नसतं. तसच ज्याची तुझ्याशी मैत्री होती, त्याला असल्या लोकांची काय मातब्बरी. 

पण तरीही कधी कधी मागे वळून पाहताना, आयुष्याचा हिशेब मांडला, तर माझ्या बाजूला शुन्य उरते. तुला गमावले आणि सर्वस्व गमावल्यासारखे झाले. पण तू खूप आठवणी सोडून गेलीस माझ्यासाठी. तुझी एक एक आठवण माझा श्वास आहे आता. कधीही एकटा पडलो कि तुझी आठवण येते. अस वाटत तू अजूनही बरोबर आहेस. आणि माझा हात हातात घेऊन मला धीर देत्येस. मग मी खूप धीराने डोळ्यातून ओघळायला आतुर असलेले अश्रू परतवून लावतो, कारण मला अजूनही वाटत, माझ्या डोळ्यातले अश्रू पाहून तू परत येशील माझ्यासाठी. मला खात्री आहे त्याची. तू आहेसच तशी. 

Monday 25 January 2016



तु कहता है तो छोड दू तेरा शहर,
पर कहीं ऐसा ना हो,
तू धुंढे मुझे, और तेरी आंखे सवाली हो … 




तेरे जख्म भी सह लुंगा ख़ुशी ख़ुशी,
कभी दिलसे मेरे खेल के तो देखो …. 




जानता हुं मै, अकेले आया हुं, अकेले जाना है,
ये भी सच है, तेरे तसव्वूरसे सफर आसां हो जाना है …. 




या अश्रुंच मोल तुला तेव्हांच कळेल,
तुला हवस वाटणारं कोणी जेव्हां,
'तुला' नाही म्हणेल …



तुला विसरू म्हंटल,
तर मग जीवनात लक्षात ठेवण्यासारखं आहेच काय …. 




अपनी आंखोसे परदा हटा दो अब नासमझिका,
न वोह झूट बोल पाती हैं,
न सच छुपा पाती हैं …. 


काय झाले माझ्या मना,
समजून तू घेशील का,
कविता हे सर्वस्व माझे,
तीज अर्थ तू देशील का. 

भाववेडे शब्द माझे,
भाववेडी कामना,
गुंफतो शब्दांत माझी,
भाववेडी कल्पना,
मांडण्या शब्दात सारे,
सामर्थ्य तू देशील का,
कविता हे सर्वस्व माझे,
तीज अर्थ तू देशील का. 

भेट झाली तुझी अचानक,
अन, शब्दग्रंथी पाझरल्या,
जपलेल्या त्या आठवणी तुझ्या,
कविता होऊनी कोसळल्या,
साठवलेल्या त्या क्षणांचे,
अर्ध्य मज देशील का,
कविता हे सर्वस्व माझे,
तीज अर्थ तू देशील का. 


ती : एकदा आली आणि जिंकून गेली 

शाळा सुटली, पाटी फुटली,
शाळामैत्रांची संगत सुटली,
इतक मोकळ आभाळ मिळालं,
कि आपापल्या विश्वात हरवून गेली,
गावे बदलली, शहरे बदलली,
कित्येकांनी तर देशाची हद्द ओलांडली,
अशाचं काही जणांमध्ये ती पण होती,
सातासमुद्रापार गेली होती,
शाळेत असताना जास्त बोलाचाल नव्हती,
एकमेकांच्या स्वभावाची काहीच जाणं नव्हती,
पण या तंत्रयुगाने तिलाही जवळ आणलं,
पण अजूनही नव्हत मन मनाशी जुळलं,
तो अबोला काही सुटेना,
बोलायचं तर खूप होत, पण काय बोलावं सुचेना,
तशातच तिचा मायदेशी येणं झालं,
हरवलेल्या आठवणीना भेटणं झालं,
जुने मैत्र नव्या रुपात भेटल्यावर,
मुळच्या खोडकर स्वभावाला नव क्षितीज मिळालं,
बोलण्यातला बुजरेपणा कुठच्याकुठे पळून गेला,
तिच्या या नव्या रूपाने ग्रुप मात्र हरखून गेला,
बोलणं तिच मृदू, पण स्वभाव तिचा मिश्किल,
कोणाची कशी फिरकी घेईल, हे सांगणं आता मुश्किल,
इथे असतो दिवस तेव्हा तिथे रात्र असते,
ती मात्र संवाद साधत रात्रीचा त्या दिवस करते,
कवितेची तिला आवड आणि चांगल्या शब्दांची तिला जाण आहे,
इंग्रजांच्या देशात राहूनही, मराठी तिचा प्राण आहे,
राहते जरी इतक्या दूर, तरी लक्ष तिच इथेही असते,
वावगं कोणी वागलं तर निषेधही ती प्रगट करते,
दिसायला पण ती सुंदर आणि बोलण्यात तिच्या माधुर्य आहे,
आगाउपणा थोडा आहे अंगात, पण वागण्यात तिच्या चातुर्य आहे,
वाटलं नव्हतं इतकी खुलून येईल ती,
इतकी मिसळून जाईल आणि फुलून येईल ती,
एकाच सफरीमध्ये ती मन सर्वांचं जिंकून गेली,
एक सुस्वभावी, समतोल विचारांची मैत्रीण आम्हाला मिळाली,
एका भेटीमध्ये तिचा परकेपणा संपून गेला,
इतके मिसळलो एकमेकांत कि,
अवघा रंग एकची झाला …. 

Monday 4 January 2016


शब्द आणि वेदना :

काहीतरी लिहावं म्हणतोय केव्हापासुन,

सुचत नाही आहे काय लिहावं पण,

विषय तर खूप पिंगा घालतायेत मनात,

कळत नाही का लिहावं पण,

लिहून तुला समजेल का,

माझ्या मनातील वेदना तुला बोचेल का,

संवेदनांचा आगडोंब उसळलाय मनांत,

पण त्या वणव्याची धग तुझ्यापर्यंत पोचेल का,

नसेल तर मग व्यर्थ आहे सारे,

कशाला मग ती विषयातली गंभीरता वगैरे,

उगा उनाड वाऱ्याने उधळलेल्या पानांसारखे,

एक दिवस विचार पण माझे उडून जातील मनातून सारे,

यासाठीच मी लिहित नव्हतो,

मनातल्या वेदनांना शब्द पुरवत नव्हतो,

पण तुझा आग्रह मोडवेना झालं मला,

नाहीतर ठरवून लेखणीला हात लावणार नव्हतो,

खरच, कधीच लेखणीला हात लावणार नव्हतो …. 

Thursday 3 December 2015

महाराष्ट्र : पुरोगामित्वाची झूल पांघरणारा प्रतिगामी प्रदेश

स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १२५ व्या जयंतीदिनी शनि शिंगणापूर येथे एक क्रांतिकारी घटना घडावी हा योगायोगच म्हणावा. महिलांना मज्जाव असणाऱ्या चौथऱ्यावर चढून एका स्त्रीने आपल्या महान रूढी परंपरांचा खून करत स्त्रियांना प्रवेश नसलेल्या भागात जाउन शनि देवाचे दर्शन घेतले म्हणजे फारच झाले. वर्षानुवर्ष फक्त पुरुषांची मक्तेदारी असलेल्या ठिकाणी स्त्री प्रवेश करते हि घटना हा "पुरोगामी" महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही हे शनि देवाचे दुधाने अभिषेक करून आपण दाखवून दिले. समाज निरक्षर राहिला तरी चालेल पण पूर्ण अंधश्रद्ध राहायला पाहिजे याची हा "पुरोगामी" महाराष्ट्र पूर्ण काळजी घेत आहे. वर्षानुवर्ष चालत आलेल्या या महान परंपरा आहेत आणि त्यांना छेद देण्याचा कोणालाही अधिकार नाही आणि जे तसा प्रयत्न करतील त्यांना या जगातून रीतसर नाहीसे करण्यात येईल हा संदेश आपण अंधश्रद्ध निर्मुलन समितीचे प्रमुख श्री नरेंद्र दाभोळकर व सामाजिक कार्यकर्ते कॉ गोविंद पानसरे यांची हत्या घडवून आणून दिलाच आहे. हो आपणच त्यांची हत्या केली आहे, कारण एवढ होऊनही जर का आपण एक समाज म्हणुन या अनिष्ट रूढी परंपरांविरुद्ध उभे राहणार नसू व जे होतंय ते मूकपणे बघणार असू तर मी म्हणेन कि त्यांच्या हत्येला आपणच सर्व जबाबदार आहोत. चुकीचे कायदे लादले म्हणून इंग्रज सरकारविरुद्ध उठाव करणारे हेच भारतीय लोक, सतीची चाल बंद व्हावी म्हणून राजा राम मोहन रॉय ना साथ देणारी हीच भारतीय मानसिकता, आज अचानक लोप पावली आहे. आज जो तो फक्त आपल्यापुरते पाहतो आहे. जे घडतंय त्याचा त्रास मला व माझ्या कुटुंबियांना होता कामा नये एवढी संकुचित जबाबदारी आपण बाळगतो आहोत.

एक समाज म्हणून आपण खूप दांभिक आहोत. एका बाजूला आपण शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला कशी स्वताच्या आईची उपमा दिली यावर भरघोस चर्चा करतो, स्त्रीला देवीची उपमा देऊन, तिला आदिशक्तीचे रूप मानून तिची पूजा करतो आणि दुसऱ्या बाजूला त्याच स्त्रीला अनिष्ट रूढी आणि परंपरांच्या आहारी जाऊन आपण कस्पटासमान वागणूक देतो. जी स्त्री हि जननी आहे, माता आहे, या सृष्टीच्या असण्यामध्ये जिचा बरोबरीचा किंवा जर जास्तच वाटा आहे तिला आपण सृष्टीकर्त्याच्या (?) दर्शनापासून वंचित ठेवतो. आणि याला आपण परंपरेचा बाळसेदार मुखवटा चढवतो. निसर्गनियमांमुळे स्त्रियांना ज्या गोष्टीला सामोरं जाव लागत त्यात तिचा काय दोष? आणि हा झगडा जर का देवाचा आणि स्त्रीचा असेल तर देवालाच निर्णय घेऊ देत कि. आपण का त्यात ढवळाढवळ करतोय. कि देव काही करू शकणार नाही व काही करत नाही यावर आपलाही ठाम विश्वास आहे कि काय? म्हणून आपण स्वतःच या सृष्टीचे नियम ठरवतो आणि ते सर्व समाजाला बंधनकारक करतो कि काय नकळे  

याच समाजाच्या अशाच विचारांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना हिंदू धर्माचा त्याग करावासा वाटला, आणि एक खूप मोठा समुदाय हिंदू धर्मापासून वेगळा  झाला कायमकरता. आणि असाच विचार आजच्या सर्व महिलांच्या मनात आला तर ? काय गहजब उडेल विचार करा फक्त. कारण विचारांना  कृतीची जोड द्यायलाच हवी अशी काही या पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्राची परंपरा नाही. पण एक नवीच परंपरा इथे जन्म घेताना दिसत आहे आजकाल. ज्यांचे विचार पटणार नाहीत किंवा ज्यांच्या विचारांनी समाज जागृत होणार असेल अश्या सामाजिक भान असलेल्या विभूतीना या जगातून तत्परतेने नाहीसे करायचे, हि ती परंपरा. आणि हे कृत्य करणाऱ्या महान क्रांतीकारकांना हे पूर्ण ज्ञात आहे कि हा महाराष्ट्र आता कधीही पेटून न उठणाऱ्या विझलेल्या ज्वालामुखीसारखा आहे. तुम्ही कितीही घाव घाला येथे परत काही असंतोषाचे जनक निर्माण होणार नाहीत, कि सुधारक जन्म घेणार नाहीत. सेनापती बापट आज हयात असते तर म्हणाले असते कि भारत एक देश म्हणून भले प्रगती करत असेल पण यात महाराष्ट्र कुठे दिसत नाही. (दिसत नाही म्हणजे नैतिकता कुठे दिसत नाही). पुढे जाऊन अस म्हणावसं वाटत कि आज जर ज्योतिबा असते तर या महाभागांनी त्यांचाही खून केला असता आणि आपण तेव्हाही असेच बघत बसलो असतो जसे आज बघत बसलो आहोत.

दिनांक : ०२ डिसेंबर २०१५

एक जाणीव शेअर करतो. झालंय काय कि, टी पी  सुरु झाल्यापासून, तो मिनी ट्रक मीच चालवतोय. आणि आता माझा त्याचावर पूर्ण कंट्रोल आलाय अस मला वाटतंय. आणि तसा आता वेळ कमी मिळतो, मग कुठेही येणजाण पण कमी झालं, त्यामुळे कार चालवण्याचे प्रसंग कमीच येतात. काल अचानक दुपारी एक काम होत म्हणून मी श्री ला म्हंटल कि आज तू माझी कार घेऊन ये. पण नंतर कार चालवताना असा जाणवल कि थोडी गडबड होत्ये चालवताना. काहीतरी चुकतंय. प्रत्येक वाहनचालकाचा आपल्या वाहनावर हात बसलेला असतो. पहिला गिअर टाकल्यापासूनच ते लगेच लक्षात येत. पण गेल्या दीड महिन्यात माझे माझ्या कारकडे पूर्ण दुर्लक्ष झाले होते. ट्रक वर ताबा मिळवताना मी कारचा कंट्रोल सोडत होतो हे लक्षातच नाही आल, कारण दोन्ही गाड्या चालवण्याच टेक्निक थोडं वेगळ आहे. त्यामुळे असाव पण मला कार चालवताना जरा सांभाळून चालवावी लागत होती. ज्या माझ्या कारने मला ड्रायविंगचा मजा दिला, जिला मी मला हवी तशी चालवू शकत होतो, आज मला तिची ओळख थोडी पुसली गेल्यामुळे सांभाळून चालवावे लागत होते. म्हंटल तर दुर्लक्ष करण्यासारखा प्रसंग, पण विचार केला तर खूप काही शिकवून जाणारा. 

जर निर्जीव कारकडे दुर्लक्ष झाल्यामुळे हा प्रसंग येत असेल, तर काही जिवलग नात्यांकडे नकळत दुर्लक्ष झाले तर काय होईल, असा विचार मनात आला आणि हादरून गेलो. आत्ताआत्तापर्यंत जे मित्र किंवा नातेवाईक आपल्या खूप जवळ होते, ज्यांच्यावाचून आपल्याला करमत नसे, दिवसभरात एकदातरी ज्यांच्याशी बोलल्याशिवाय आपल्याला चैन पडत नसे, अश्या व्यक्तींकडे जर नकळत का होईना आपल्याकडून दुर्लक्ष होत असेल, तर त्यांना काय वाटत असेल. समजून घेतलं तर ठीक, पण नाही समजून घेतलं तर. घरात म्हातारे आई वडील असतात, आज त्यांच्यामुळेच आपण इथवरचा प्रवास केलेला असतो, मुल असतात म्हणजे पुढची पिढी, या सर्वाना वाटत असत कि रोजच्या कामाच्या धबडग्यातून थोडा वेळ तरी आम्हाला द्यावा. अगदी तासंतास गप्पा नाही मारल्या तरी निदान चौकशी करावी बास, एवढीच माफक अपेक्षा असते बऱ्याचदा या सर्वांची. पण आपण आपल्यातच इतके गुंग असतो कि या सगळ्याचा आपल्याला विसर पडतो. नाती टिकवायला संवाद जरुरीचा असतो हा मुख्य नियमच आपण विसरून जातो. आणि जेव्हा लक्षात येत ना तेव्हा थोडा उशीर झालेला असतो. नाती तुटत नाहीत, पण त्यातला ओलावा नष्ट झालेला असतो. 

मान्य आहे कि आजचे आयुष्य खूप धकाधकीचे आणि आव्हानांचे आहे. माणूस स्वतःबरोबरच वेळेशीही झुंज खेळतोय. कितीही मनात आल तरी कित्येकदा प्रत्यक्ष भेट घेण नाही शक्य होत. पण हि धकाधकी तर आता जीवनाचा मुख्य भाग आहे आपल्या, तिच्यापासून तर दूर पळता येणारच नाही. पण ते करताना जर आपण आपले आईवडील, पत्नी, मुल, मित्र व इतर आप्त यांच्यासाठी अधूनमधून थोडा वेळ काढला तर काय बहार येईल बघा. सगळाच समतोल साधला जाईल. या सर्वांशी बोलल्याने तुम्हालाही थोडा विरंगुळा वाटेल आणि त्यानाही थोडं बर वाटेल कि बघा एवढ्या व्यापातून पण हा आमच्यासाठी थोडा का होईना पण वेळ काढतोच. संवाद खूप महत्वाचा भाग आहे मानवी जीवनातला. संवाद नसेल तर नाती तुटायला वेळ लागत नाही, मग ती कितीही जवळची का असेना. 

सांगायचा मुद्दा हा कि, माझा माझ्या कारशी संवाद कमी झाला होता, तर ते निर्जीव यंत्र पण साथ देईना  झालं, मग भावभावनांचा कल्लोळ असलेल्या मनांच काय होत असेल. आता ठरवलंय कि कितीही बिझी असलो तरी योग्य तितका वेळ सर्वांनाच द्यायचा, मग ती कार का असेना …. 

Sunday 22 November 2015

मुंबई पुणे मुंबई २ :

दिग्दर्शक सतीश राजवाडे. एक नावाजलेलं नाव. दूरदर्शनवरच्या काही नामांकित मालिका लिहिणारा, कसदार अभिनय करणारा आणि दिग्दर्शन करणार नामवंत व्यक्तिमत्व. या चित्रपटाच्या पहिल्या भागाच्या यशस्वी प्रदर्शनानंतर आणि मिळालेल्या घवघवीत यशाने अपेक्षा वाढवणार नाव. पण दुसऱ्या भागात पूर्ण अपेक्षाभंग करणार पण हेच नाव. कोणी म्हणेल कि हा ईसम चित्रपटाबद्दल लिहायचं सोडून दिग्दर्शकाच्या मागे का लागलाय. कारण माझ्यामते जसे एखाद्या चित्रकाराला चित्र काढायच्या आधीच ते चित्र डोळ्यांसमोर दिसत असते, तसेच लेखकाला व दिग्दर्शकालापण आपली कलाकृती जाणवत असते, जाणवली पाहिजे. ती जर का नसेल जाणवत तर राजवाडे आणि इतरांमध्ये मग काय फरक.

या चित्रपटाची एकच जमेची बाजू म्हणजे, स्वप्नील जोशीचा अभिनय. पहिल्या भागातही त्याने उत्तम अभिनय केलाच होता, परंतु या भागात त्याने मुक्ता बर्वे सारख्या कसदार अभिनेत्रीला निष्प्रभ करण्याइतपत जबदरस्त अभिनय केलाय अस म्हणायला नक्कीच वाव आहे. मी काही स्वप्नील जोशीचा चाहता वगैरे नाही. खरतर, मला मुक्ताचा अभिनय आणि तिचा वावर खूप आवडतो. पण का कुणाश ठाऊक पण पहिल्या भागात सराईत अभिनय करणारी मुक्ता या भागात कुठे दिसलीच नाही.

चित्रपटाच कथानकही फारच बाष्कळ गोष्टीवर रेंगाळत ठेवल्यासारख वाटत. लग्नासारखा महत्वाचा निर्णय, लग्न दोन दिवसांवर आल तरी मुलगी घेत नाही आणि मुलगा पण तोवर तिची वाट बघतो हे मनाला अजिबात पटत नाही. अगदी दिग्दर्शक राजवाडे असले तरी.

चुकीच्या निर्णयावर किवा निर्णय न घेतलेल्या निर्णयावर आपण म्हणु, मुलीला सावरून घेणाऱ्या आणि तिला एकट पडू न देणाऱ्या बापाच्या भूमिकेला मात्र सलाम. कित्येकदा आपले निर्णय चुकतात, पण कोणी पाठीराखा मिळत नाही मग आपण एकतर कोसळतो किंवा मग कधी कुठले निर्णय एकहाती घेत नाही. लोक काय म्हणतील याचा जास्त विचार करतो. पण इथे तिच्या अवघडल्या अवस्थेत तिच्या वडिलांनी साथ दिलेली दाखवून दिग्दर्शक राजवाडेनि थोडी भरपाई केली आहे.

बाकी सर्वांचे अभिनय ठीकठाक.

कशासाठी बघावा हा चित्रपट : समजूतदार वडिलांसाठी आणि स्वप्नील जोशीच्या अभिनयासाठी
का बघू नये : न पटणार कथानक

मी हा चित्रपट पुन्हा बघणार नाही, अगदी मराठीचा अभिमान असला तरीही.

Thursday 29 October 2015

दुभंगलेली नाती :

वस्तू जुन्या झाल्या किंवा नकोश्या झाल्या, कि आपल्याला ती अडगळ वाटायला लागते, मग आपण घर सफाईच्या नावाखाली अश्या वस्तुंना बाहेरचा रस्ता दाखवतो. प्रेमाचं पण तसच काहीसं आहे. एकेकाळी जीवापाड जपलेल नात, काळाच्या ओघात नष्ट होत. ज्या व्यक्तीशी बोलल्याशिवाय दिवस सुरु झाला असे वाटत नसे, आपली सर्व सुख दुख जीला सांगितल्याशिवाय आपल्याला करमत नसे, तिच्या सुख दुख्खात पण आपण तेवढ्याच तन्मयतेने समरस होत असु, अशी नातीही कधी कधी जड वाटायला लागतात, मग एकमेकांच्या वागणुकीत दोष आढळायला लागतात. त्याची कारणे काहीही असू शकतात. पण परिणाम एकच असतो. मग आपण अश्या जड नात्यातून बाहेर पडण्यासाठी कारण शोधायला लागतो. नात जोडायला खूप कष्ट घ्यावे लागतात, परंतु ती तोडण्यासाठी अगदी फुटकळ कारणही पुरतात. उदाहरणादाखल "तुझ माझ्याकडे लक्षच नाही" किंवा अगदी याच्या उलट म्हणजे "तू माझ्यावर फारच देखरेख करतोयस / करत्येस", "किती प्रश्न विचारतोस / विचारतेस? घुसमट होत्ये अगदी", "मी का म्हणून तुझं ऐकायचं, मला माझे निर्णय घेता येतात" इत्यादी. खर म्हणजे या वाक्यांना किंवा नंतर कशालाही काही अर्थ नसतो. ते नात जपण्यासाठी घेतलेले कष्ट विसरून आपण त्यांतून बाहेर पडण्यासाठी त्यात अनेकानेक दोष शोधायला लागतो. आणि मग त्यातूनच विसंवाद वाढीस लागतो. विसंवादातून दुरावा वाढायला लागतो, आणि नात्यातील ओढ नष्ट होते. मग होतो एका चांगल्या नात्याचा अंत. यात दोष कोणाचाच नसतो. असेल, तर तो फक्त काळाचा दोष असतो. नाती जोडताना आपण बऱ्याचदा त्याची भव्यता पाहतो, त्यातील खाचखळगे कालांतराने नजरेस पडतात. सोडायचहि असत आणि तोडायचही नसत, मग होते मानसिक ओढाताण. त्यातूनच शाब्दिक खटके उडायला लागतात, एकमेकांवर असले - नसलेले दोषारोप केले जातात. आणि या सगळ्याच पर्यवसान एका सुखसंवादाच्या नात्याचा अंत होण्याने होतो. हे अस होणं गरजेच होत का? याला दुसरा काही पर्याय नव्हता का? न तोडता एका समान पातळीवर हे नात जपता नसत आल का? हे प्रश्न पुन्हा उभेच राहतात अनुत्तरीत. कारण आपण बरेच निर्णय भावनेच्या आधारे घेत असतो. आणि जीथे भावनाच उरत नाही, तिथे या प्रश्नांनाही काही अर्थ उरत नाही. बघा जमल तर, नात्यात दुरावा येईल इतका विसंवाद होऊ देऊ नका. खूप दुर्मिळ झालीयेत नाती आजच्या व्यावहारिक जगात. दुखावलेल मन सावरायला खूप काळ जावा लागतो आणि जरी काळ गेला तरी जखम भरून येईल आणि दुभंगलेली नाती पुन्हा पूर्ववत होतील याची काही शाश्वती नाही 

Tuesday 20 October 2015



तेरा तसव्वुर :

बरंसोसे छिपे हैं कुछ ख्वाब सिने मे,

तेरे आनेसे उन्हे थी जंमी मिल गयी,

तुझे देखा पहली बार और समझ आयी ये बात,

मेरी शायरीमे क्या थी कमी रह गयी,

यु तो बाते बनाना कोई बडी बात नही मेरे लिये,

पर तेरे आनेसे जुबां थमी रह गयी,

खामोश लफ़्जोको कैसे समझाऊ ये बात,

क्या मुहोब्बतमे मेरे कमी रह गयी,

ना मिलते हो तुम, ना तुम्हारा तसव्वुर कही,

अब जीनेकेलीये तुम्हारी यादें

और उन यादोमे बस तुम्ही रह गयी ….